दालचिनी, उष्ण कटिबंधातील एक सदाहरित वृक्ष आहे. अन्नात चवीचा मोठा वाटा असणारी दालचिनी केवळ चवीपुरतीच मर्यादित नसून आरोग्यादायीही आहे. मुळात, भारतात उगवणारे हे झाड आयुर्वेदातही त्याचे स्थान ग्रहण करून आहे.
दालचिनी मिळविण्यासाठी, दालचिनीची झाडे किमान तीन वर्षाची होऊ द्यावी लागतात. याचे मुख्य कारण म्हणजे, हि झाडाची साल आहे. झाडाचे संपूर्ण गुणधर्म होऊन, त्याची चव तयार होणे यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी हा आवश्यक आहे.
दालचिनी काढतात कशी?
वर उल्लेख केल्याप्रमाणे, हि झाडाची साल आहे. खोडाच्या वरील आवरणाच्या आत आणि खोडाच्या गाभ्याच्या वर अशा नाजूक ठिकाणी दालचिनीचा थर असतो. यापेक्षा, खोडाच्या आवरणाच्या आतील भाग म्हणजे दालचिनी असे लक्षात ठेवणे सोयीस्कर होईल. दालचिनीचा थर काढणारे काही विशिष्ठ कारागीर असतात. होय, कारागीरच, कारण खोडाखालून दालचिनी काढणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे.
सदर साल काढताना मोठ्या कापलेल्या खोडावर (अगदी खोडच नाही जाड फांदीही चालते) पंधरा ते वीस सेंटीमीटर अंतरावर आडवे काप देतात. मग, या आडव्या कापांपासून चार ते पाच सेंटीमीटरचे उभे काप देतात. या उभ्या कापाच्या खाली अलगत परंतु तितकीच धारदार सुरी घालून तो काप अलगद वेगळा करतात. यानंतर कापलेले सर्व भाग वाळवले जातात.
दालचिनीला शक्यतो सावलीत वाळविले जाते. याचे मुख्य कारण, जर उन्हात दालचिनीचे साल वाळवले, तर त्यात असणारे औषधी गुणधर्म कमी होतात, चवीत बदल होतो. थोडक्यात, दालचिनीचा दर्जा खालावतो.
दालचिनीचे औषधी महत्त्व
कफ आणि वात विकारांवर दालचिनीला आयुर्वेदात महत्त्व आहे. श्वसन आजारांवर दालचिनीचा खूप उपयोग होतो. उदाहरणार्थ, दमा, सर्दी खोकला इत्यादीवर दालचिनी गुणकारी आहे. दालचिनी मधात उगाळून घेतल्यास वाताचे आणि कफसंबंधी अनेक आजार शमवण्याची ताकद दालचिनीमधे आहे. हृदय विकार दूर ठेवण्यातही दालचिनीचा मोठा फायदा होतो. दातासंबंधी काही तक्रारी असतील तर दालचिनीच्या तेलात कापसाचा बोळा भिजवून दातात धरल्यास फार मदत होते.
दालचिनीचे अनेक फायदे जरी असले तरी थोडी सावधानता बाळगणे गरजेचे असते. दालचिनी उष्णप्रवृत्तीची असल्याकारणाने औषध म्हणून उपयोग करताना आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेवन करावे.
थोडक्यात, भारतीय खाद्यसंस्कृतीमधे दालचिनीला असलेले महत्त्व हे केवळ चवीसाठी नसून त्यामागे आरोग्याचाही विचार केला गेलेला आहे. अगदी चहापासून ते जेवणापर्यंत अनेक पदार्थात दालचिनीला प्राधान्य देणाऱ्या आपल्या पूर्वजांचे मनापासून आभार.
आणखी माहितीसाठी येथे विकिपीडिया लिंक जोडत आहे. तसेच, ब्लॉग पेजकडे परत जाण्यासाठी येथे क्लिक करा.